मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर घातपात करणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. धमकी देणारे ४ ते ५ जण उर्दूत बोलत होते, अशी माहिती कंट्रोल रुमला फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. त्याचे संपूर्ण संभाषण ऐकल्याचा दावाही नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.
एका अज्ञात व्यक्तीनं महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन केला. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठा घातपात घडवून आणणार आहे, अशी माहिती त्याने दिली. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये ४ ते ५ जण प्रवास करत असून ते मातोश्रीबाहेर घातपात घडवून आणण्याबाबत बोलत होते. त्यांचे संभाषण कानावर पडल्याने त्या व्यक्तीने ही संपूर्ण माहिती तत्काळ महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन करुन दिली. मुंबहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी उर्दू भाषेत बोलत होते. तसेच, मुंबई भायखळ्यातील मोहम्मद अली रोडवर एक खोली भाड्याने घेण्याबाबतही ते बोलत होते, असा दावाही फोन करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
… तर केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची जबाबदारी : संजय राऊत
दरम्यान, याविषयी संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. “मातोश्रीबाहेर घातपात घडवण्याबाबत चर्चा करणारे कोणते तरुण होते, काय होते हे मला माहित आहे. आमच्याकडे सगळी माहिती आहे. राम मंदिर उडवून देण्याची भाषा करणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुस्लिम नाव घेतली, या देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायच्या हे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. “ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रातील डाऊटफुल असून ते सुडाने पेटलेलं सरकार आहे. ज्या पद्धतीने शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलेला आहे. त्यामुळे भविष्यात काय घडलं तर याची जबाबदारी केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची असेल”, अशी टीकाही खासदार संजय राऊत यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या केसालाही धक्का लागणार नाही
ठाकरे गटाचे अजय चौधरी यांनी देखील मातोश्रीबाहेरील घातपात घडवण्याच्या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना देखील अशा धमक्या आल्या होत्या. मात्र, त्यांच्या केसालाही देखील धक्का लागला नाही. कारण शिवसैनिकांचे कवच त्यांच्याभोवती होतं, असं अजय चौधरी म्हणाले.