राजेंद्रकुमार शेळके
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स (IAPT) महाराष्ट्र रिजनल कौन्सिल या संस्थेद्वारे भौतिकशास्त्र विषय शिक्षकांचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच पार पडले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर भौतिकशास्त्र विषयाचे अभ्यासक्रम, अध्यापन व अध्ययन पद्धती, आव्हाने, संधी व भवितव्य या विषयावर विस्तृत चर्चा झाली. याशिवाय भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्याचे नियोजन या वेळी करण्यात आले.
शैक्षणिकदृष्ट्या या धिवेशनाचा फायदा सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषय शिक्षक व विद्यार्थी वर्गाला होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी सांगितले की, या अधिवेशनाच्या निमित्ताने विद्यार्थी वर्गाच्या बौद्धिक ज्ञानात भर पडून पदार्थविज्ञान विषयात रुची निर्माण होण्यास मदत होईल. तसेच पदार्थविज्ञान शिक्षकांच्या विविध प्रकल्पांना चालना मिळेल.
या वेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डॉ. संजय पिंगळे व डॉ. राजमोहन परदेशी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य माहिती दिली. समारोप समारंभासाठी डॉ. एम. एल. ओगलापूरकर व डॉ. जे. पी. गद्रे हे आय.ए.पी.टी.चे जुन्या काळातील सदस्य उपस्थित होते. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक धोरण अधिवेशनात महाराष्ट्रभरातील १०० पेक्षा जास्त भौतिकशास्त्राचे शिक्षक, संशोधक आणि संस्थेच्या सचिव डॉ. रेखा घोरपडे, स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ शेवाळे, सचिव डॉ. लता जाधव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, उप प्राचार्य डॉ. प्रवीण चोळके, डॉ. शिवाजी शिंदे, मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. भरत कानगुडे यांसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. महेश कांबळे, डॉ. स्मिता लोकरे, डॉ. गणेश लोणकर, हेमंत वाईकर यांनी विशेष प्रयत्न केले. वृत्तपत्र विभागाचे सर्व विद्यार्थी व प्रमुख अश्विनी जाधव यांनी संपूर्ण अधिवेशनाचे वार्तांकन केले. आभार व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, डॉ. प्रवीण चोळके व प्रा. कानगुडे यांनी केले.