यवत : यवत येथील दर शुक्रवारी भरणारा आठवडा बाजार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या सेवा मार्गावर भरत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
यवत येथे दर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरतो. यवतमाळ यवतच्या जवळपास असलेल्या अनेक गावांसाठी हा बाजार महत्त्वाचा असून, यवतबरोबर आजूबाजूचे गावातील नागरिक देखील यावेळी बाजारासाठी यवत येथे येतात. परंतु, पुणे-सोलापूर सेवा रस्त्यावरच अनेक दुकानदार आपली दुकाने थाटत असल्याने बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
सेवा रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या दुकानांमुळे व रस्त्यावर कशीही वाहने लावून जाणाऱ्या वाहनचालकांमुळे गावातील रहिवासी व बाजारासाठी येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. विक्रेते रस्त्यावरच पथारी पसरून बसतात. असंख्य गाडेही रस्त्यावरच लागतात. अगदी रस्त्याचा निम्मा भाग ते व्यापून घेतात. त्यामुळे स्टेशन रस्त्यावरून येणारी व शाळेच्या बाजूने येणाऱ्या वाहनांची मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सकाळी अनेक नोकरदार रेल्वे हडपसर पुणेकडे जात असताना अनेकवेळा त्यांची गाडी या वाहतूक कोंडीमुळे निघून जाते. तर सायंकाळच्या वेळी जाताना सेवा रस्त्यावर लावलेल्या दुकानांमुळे वाहतूक ठप्प होते.
पूर्वी सेवा रस्त्यावरून येणारी पीएमपीएलची बस देखील आता वाहतूक कोंडी हस्त होत असल्याने दर शुक्रवारी मुख्य मार्गावरूनच जात असल्याने अनेक प्रवाशांना व विशेषत: करून महिलांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागतो. सायंकाळी पाचनंतर तर वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडते. एवढेच नव्हे तर अनेक वाहन चालक सेवा रस्त्यावरच वाहने लावून बिनधास्तपणे बाजारासाठी खरेदी करण्यासाठी जातात.
यवत गाव, शाळा, उत्तर भागात जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. पूर्वी या परिसरात ठराविकच दुकाने लागली जात होती. परंतु, सध्या सायंकाळनंतर या रस्त्यावर व्यापाऱ्यांची संख्या वाढत असून, या रस्त्यावरून चालणेही कठीण होते. एका बाजूने असलेल्या रस्त्यावरील निम्मा भाग विक्रेते व्यापून घेतात. रस्त्यावर भरत असलेला बाजार प्रशासनाने योग्य नियोजन केल्यास दुपारनंतर मोकळ्या होणाऱ्या बैल बाजार परिसरात अगदी योग्य पद्धतीने थाटला जाऊ शकतो, अशी चर्चा नागरिक करत आहेत.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांना देखील या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहे.