पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहात असलेल्या भाईचा भर रस्त्यात बर्थडे साजरा करणे त्याच्या कार्यकर्त्यांना चांगलचं महागात पडलं आहे. या कार्यकर्त्यांनी भाईचा बर्थडे साजरा करताना येरवडा कारागृहाची प्रतिकृती असलेला केक तयार करून आणला होता. एवढंच नाही तर त्या केकेवर स्वयंघोषित भाईचा फोटो लावून भर रस्त्यात केक कापला होता.
या भाईच्या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ होताच व्हायरल पोलिसांनी आता या पंटर लोकांवर कारवाई करत त्यांचीही रवानगी ‘भाई’ रहात असलेल्या कारागृहात केली आहे.
चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जनता वसाहत जनवाडी परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. ओम बुरुड उर्फ सोनू, अनिकेत कातुर्डे उर्फ मन्या, युवराज बोराडे उर्फ बाळा, अनिकेत धोत्रे, विशाल रत्नाकर या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यांच्यासह ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार श्रीधर विश्वास शिर्के यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जनवडी परिसरातील रेकॉर्ड वरील आरोपी शुभम प्रदीप शिरकर सध्या येरवडा कारागृहात आहे. दरम्यान एक जानेवारीला त्याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आरोपींनी भर रस्त्यात गर्दी जमवून त्याचा वाढदिवस साजरा केला.
एवढंच नाही तर येरवडा कारागृहाची प्रतिकृती असलेला केक बनवून तो केक तलवारीने कापून भर रस्त्यात वाढदिवस साजरा केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी तातडीने याची दखल घेत गुन्हा दाखल करून आरोपींना अटकही केली आहे.