उरुळी कांचन : वाढदिवस म्हटलं की केक कापणं, जल्लोषाचं वातावरण निर्माण होत असतं. या वाढदिवसाच्या निमित्तानं भरमसाठ खर्चही केला जातो. परंतु, भवरापूर (ता. हवेली) येथील प्रगतशील शेतकरी सुभाष साठे यांनी चार वर्षांच्या चिमुकलीचा वाढदिवस मोठ्या थाटात केला पण कुठं हॉटेल किंवा लॉन्सवर नाहीतर चक्क ऊसाच्या फडात. हो…त्याचं कारणही तसंच आहे.
सावली जाधव (वय ४, बोलखेडा, संभाजीनगर) असं या चिमुकलीचं नाव. सावली ही तिच्या आजी-आजोबांसोबत भवरापूर येथील शेतकरी सुभाष साठे यांच्या शेतात ऊसतोडणीसाठी आली होती. ऊसाच्या फडात छोटीशी चिमुकली डोक्यावर ऊसाची मोळी घेऊन काम करत होती. तेव्हा शेतकऱ्याची नजर तिच्यावर पडली अन् त्याने सहज विचारले ही मुलगी कोणाची आहे. खूप छान काम करते. तेव्हा त्या मुलीच्या आजोबांनी ‘ती आमची नात असून, खूप हुशार आहे’ असं म्हणत आज तिचा वाढदिवस असल्याचेही सांगितले.
मग काय…सावलीच्या आजोबांनी हे सांगताच सुभाष साठेंच्या आतला माणूस जागा झाला. त्यांनी लगेचच उरुळी कांचन गाठलं अन् सुरु केली तिच्या वाढदिवस साजरा करण्याची तयारी. साठे यांनी चिमुकलीसाठी कपडे खरेदी केले. एक मोठा केकही आणला. आता हा वाढदिवस साजरा करायचा त्यांनी ठरवले. पण ठिकाण कोणतं हे माहिती नव्हते. मात्र, वाढदिवस साजरा करायचा हे त्यांनी पक्क केलं होतं. अखेर दुसरीकडे कुठं नाहीतर थेट ही चिमुकली जिथं काम करताना दिसली त्याच ऊसाच्या फडात वाढदिवस साजरा करण्याचं अखेर ठरलं.
साठे यांनी आणलेला हा केक या चिमुकलीने कापला अन् आगळावेगळा वाढदिवस साजरा झाला. सर्वांना केक मिळालाच शिवाय नाष्ट्याची सोयही यावेळी साठे यांनी केली. या अचानक साजरा झालेल्या वाढदिवसाने चिमुकल्या सावलीच्या चेहऱ्यावर हास्य उघडपणे दिसून येत होते. इतकेच नाहीतर ज्या आजी-आजोबांनी तिला कामासाठी आणले होते, त्यांना हे ‘सरप्राईज’ पाहून अत्यंत आनंद झाला. त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू सारं काही सांगून जात होते.
वाढदिवस साजरा करून समाजासाठी निर्माण केला आदर्श
आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत सुभाष साठे यांनी हा अनोखा वाढदिवस साजरा करून समाजासाठी एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या या सामाजिक कार्याचे उरुळी कांचन, भवरापूर व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
वाढदिवस असल्याचं समजताच मनात आलं ते करून दाखवलं
”जेव्हा मला या चिमुकलीचा वाढदिवस असल्याचे समजले तेव्हा आपण तिचा वाढदिवस साजरा करायचाच असं मनात आलं. त्यामुळेच मी तिच्यासाठी नवीन कपडे, केकही आणला. या चिमुकलीच्या वाढदिवसाबद्दल माझ्या मनात जे आलं ते मी करून दाखवलं”, असे सुभाष साठे यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सांगितले.