पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे पार्ट टाईम जॉबच्या आमिषाने एका व्यक्तीची ऑनलाईन माध्यमातून ३२ लाख ९२ हजार ५६३ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली आहे.
याप्रकरणी जयवंत शामराव पाटील (वय ४६, रा. विनायकनगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अनु शर्मा आणि तीच्या इतर साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, जयवंत पाटील यांना एका मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज आला होता. एका मार्केटींग कंपनीची भरती असून तुम्हाला पार्ट टाईम जॉब संदर्भात मी मार्गदर्शन करून योग्य तो सल्ला देतो. असं या मेसेजमध्ये नमुद करण्यात आलं होतं.
त्यानंतर संबंधित अनु शर्मा हीने फिर्यादी यांना वेळोवेळी ऑनलाईन टास्क देऊन ३२ लाख ९२ हजार ५६३ रुपये गुंतवणूक करण्यात भाग पाडले. मात्र, फिर्यादी यांना या बदल्यात कोणताही मोबदला मिळाला नाही. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक करण्यात अली आहे. अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.