मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवसेंदिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आधिक आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यानंतर दोन्ही गटांमधील संघर्ष टोकदार झाला असून अजित पवार गटाला आता माफी नाही, अशी भूमिका खासदार शरद पवारांनी घेतली आहे. “अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांबद्दल आताकोणताही फेरविचार नाही,” असं शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे सरकार गेलं तर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन माफी मागतील, या आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे, असा दावा माजी मंत्री राजेश टोपे यांनी नुकताच केला होता. याबाबत प्रश्न विचारला असता खासदार शरद पवार म्हणाले की, “आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे की नाही, याबाबत मला माहीत नाही, पण असा निर्णय ज्यांनी घेतला आहे, त्यांच्याबाबत आमच्या पक्षात आता फेरविचार होणार नाही. भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेण्यास जे जबाबदार आहेत, त्यांच्याबाबत आमची भूमिका एकदम स्वच्छ आहे,” असं म्हणत महायुतीत गेलेल्या गटाला शरद पवार यांनी चांगलंच फटकारलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत माहिती दिली. “दिल्लीत आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर प्राथमिक चर्चा होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीकडून आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील. राज्यातील जागावाटपाचं चित्र कसं असावं यावर ही बैठक होणार असली तरी ही काही अंतिम बैठक नाही. ही जागावाटपाच्या चर्चेची सुरुवात आहे. तसेच यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि इतर डाव्या पक्षांनाही सहभागी करून घ्यावं, अशी आमची भूमिका आहे,’ असंही शरद पवार म्हणाले.