चाकण: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका इमारतीच्या बेडरूमच्या खिडकीतून पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी 8 जानेवारीला सकाळी आंबेठाण गावात घडली. दुर्वेश ज्ञानेश्वर कारवार (वय 4, रा. साईबाबा पॅराडाईज, आंबेठाण, ता. खेड) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्वेशचे आई आणि वडील सोमवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेले. त्याच्या घरी दुर्वेश, त्याची बहिण, काकू आणि आजी असे चौघेजण उपस्थित होते. दरम्यान दुर्वेश हा घरातील बेडरूममध्ये खेळत होता. त्यानंतर तो खेळता खेळता बेडरूमच्या खिडकीमध्ये गेला. त्याने खिडकीतून खाली डोकावून पाहिले असता त्याचा तोल गेला. तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.