लोणी काळभोर : पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी केसनंद (ता. हवेली) येथील सारिका मिलिद हरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत उपसभापती पदासाठी सारिका हरगुडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी हरगुडे यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली.
मावळते उपसभापती रविंद्र कंद यांनी आपला कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर उपसभापती पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पदाची निवडणूक प्रक्रिया पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात मंगळवारी (ता.02) पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया पुणे जिल्हा ग्रामीण सहकारी संस्थेचे उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात हरगुडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली.
सारिका हरगुडे यांची सेवा विकास शेतकरी सोसायटी महिला राखीव मतदारसंघातून एप्रिल २०२३ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेमध्ये संचालिका म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघावर महिला प्रतिनिधी म्हणून त्यांची ऑक्टोबर २०२३ मध्ये बिनविरोध निवड झाली. तर आता त्या पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती म्हणून कामकाज पाहणार आहेत.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, संचालक विकास दांगट, शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके, पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, प्रकाश जगताप, सुदर्शन चौधरी व संचालक मंडळ उपस्थित होते.
सभापती दिलीप काळभोर यांच्याकडून शुभेच्छा
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी सारिका हरगुडे यांची उपसभापती बिनविरोध निवड झाल्यानंतर शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपसभापती रविंद्र कंद यांनी त्यांच्या कार्यकालात चांगले काम केल्याबद्दल त्यांचे सर्व सभासदांनी आभार मानले.