लोणी काळभोर: सध्या आगामी लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे विद्यमान खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करणार असे आव्हान दिले आहे. त्यानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीची चर्चा राज्यभरात सुरु झाली आहे. तसेच मतदारसंघातील मतदारांमध्येही उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. बहुतेक ठिकाणच्या चर्चांमध्ये खासदार कोल्हे हे गेल्या साडे चार वर्षांत मतदारसंघात दिसले नाहीत किंवा त्यांनी केलेली विकासकामे ही दिसत नाहीत, असा त्या चर्चेचा सूर असल्याचे पाहायला मिळत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघावर सर्वच पक्षांकडून दावे- प्रतिदावे केले जात असून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. सध्या ही जागा मूळ राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ताब्यात आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपदेखील शिरूर मतदारसंघात निवडणूक लढण्यास प्रबळ इच्छुक आहे. शिवसेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार होण्यासाठी कंबर कसली असून जोरदार प्रयत्न चालवलेले आहेत. मात्र, अजित पवार गट व भाजप पुढे शिंदेच्या शिवसेनेची डाळ शिजेल, अशी अजिबात परिस्थिती नाही.
राज्यात भाजप, शिवसेना व अजित पवार गट यांची सध्या युती असली, तरी या जागेसाठी तिघेही तीव्र इच्छूक आहेत. त्यामुळे ऐनवेळी शिरूर मतदारसंघ कुणाकडे जाईल व कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून वा गटाकडून निवडणूक लढवेल, हे सांगणे सध्या तरी कठीण दिसत आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे त्या तुलनेत तगडा उमेदवार नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष ( उद्धव ठाकरे) व काॅंग्रेस पक्ष विरूद्ध भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट) यांच्यात या जागेसाठी तीव्र लढाई पाहावयास मिळू शकते. जर ही जागा भाजपच्या वाट्याला गेली, तर भोसरीचे आमदार महेश लांडगे हे भाजपचे उमेदवार असतील. त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवून जोरदार तयारी सुरु केली आहे.
आगामी काळात शिरूर लोकसभा मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे उदयाला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव व आमदार महेश लांडगे यांच्यात तिरंगी लढतीचीच अधिक शक्यता आहे. कोल्हे आणि लांडगे यांच्या तुलनेत शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातील समस्यांची चांगलीच जाणीव असून जनसंपर्कही दांडगा आहे.
विद्यमान खासदार कोल्हे यांना चांगली संधी मिळाली होती, परंतु त्यांना मतदारसंघासाठी काहीही ठोस करता आलेले नाही, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर गायब झालेले कोल्हे नुकतेच प्रकट झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नेमके याच मुद्द्यावर बोट ठेवले आहे. तसेच दिलीप वळसे पाटील व शिवाजीराव आढळराव पाटील एकमेकांशी जूळवून घेत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या दोघेही जुन्या मैत्रीला उजाळा देत आहेत. मंत्री दिलीप वळसे पाटील कदाचित विधानसभेला त्यांच्या मुलीला रिंगणात उतरवून आढळरावांना लोकसभेला मदत करतील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शिरूरमध्ये काय समीकरणं असतील, याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सलग तीन निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. तब्बल तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. शिरूर लोकसभा मतदारसंघात पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एका तर ग्रामीण भागातील चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर हा मतदारसंघ कुणासाठी अनुकूल असेल ? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके आमदार असून त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. आंबेगाव मतदारसंघातील आमदार दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत आहेत. खेडचे आमदार दिलीप मोहितेंनीही अजित पवारांची साथ दिलीय. हडपसरचे आमदार चेतन तुपेही अजित पवारांसोबत आहेत. तर शिरुरचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांची साथ दिलीय. तर भोसरी मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडींचा माजी खासदार आढळराव पाटील यांना फायदा होईल, असे चित्र सध्या तयार झाले आहे. त्यातच अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील भाजप सोबत सत्तेत सहभागी झाल्यानं शरद पवारांसोबत असलेले खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्यासमोरील आव्हानं वाढली आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्लात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा शिरकाव झाला होता. आता भाजपनंही शिरूर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार अशी चर्चा सुरू झाली आहे.