पुणे : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कृत्याने धुमाकूळ घालून दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही ७७ वी कारवाई आहे.
अजय युसुफ मौजण (वय १९, रा. पाचुंदकर वस्ती, देवाची वाडी, रांजणगाव गणपती, ता. शिरुर) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून, त्याने साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकू, लोखंडी कोयता यासारख्या हत्यारांसह जबरी चोरी, चोरी, घराविषयी आगळीक, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. त्याच्या गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याने हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी गुंड अजय मौजण याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई केली.
हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी अजय मौजण याच्याविरोधात मागील ५ वर्षांत ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी अजय मौजण याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कामगिरी रविंद्र शेळके वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन पुणे व चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे आधिपत्याखाली पोलीस आधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.