सागर जगदाळे :
भिगवण: भिगवण (ता. इंदापूर) येथील भिगवण शिक्षण प्रसारक मंडळास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ संलग्नित, बी. कॉम आणि वृत्तपत्रविद्या व जनसंवाद पदविका हे दोन नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर यांनी दिली.
याबाबत बोलताना प्राचार्य तुषार क्षिरसागर म्हणाले, वेळेअभावी शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या संस्थेच्या वतीने 2015 पासून मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र सुरू करण्यात आले आहे. बी.ए, एम.ए, शालेय व्यवस्थापन पदविका हे अभ्यासक्रम येथे सुरू आहेत. तर यंदाच्या वर्षीपासून वरील दोन नवीन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.
दरम्यान, पत्रकारिता व जनसंपर्क ही महत्वाची क्षेत्रे असून अनेक नोकरी करणाऱ्यांना पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रामध्ये दूरस्थ माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सोय परिसरात नव्हती यामुळे इच्छा असूनही अनेकांना हा अभ्यासक्रम पूर्ण करता येत नव्हता. त्या सर्वांसाठी वृत्तपतविद्या व जनसंवाद पदविका आणि बी. कॉम हे दोन अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.