सेंचुरियन: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. बॉक्सिंग डे कसोटीत अवघ्या तीन दिवसांत यजमान संघाने भारताविरुद्ध एक डाव आणि 32 धावांनी मोठा विजय नोंदवत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 245 धावांपर्यंतच मर्यादित राहिला होता, तर दुसऱ्या डावात केवळ 131 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावा केल्या होत्या आणि 163 धावांची आघाडी घेतली होती.
पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न घेऊन दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्याच सामन्यात यजमान संघाने जोरदार मुसंडी मारली आणि मोठ्या फरकाने विजय मिळवला. कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने पहिल्या डावात 5 बळी घेतले आणि टीम इंडिया अवघ्या 245 धावांत गडगडली. केएल राहुलने पहिल्या डावात शतक झळकावले. तर विराट कोहलीने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले, पण पराभव टाळण्यासाठी ते पुरेसे नव्हते.
फलंदाजांनी गुडघे टेकले
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत टीम इंडियाची फलंदाजी खूपच लाजिरवाणी होती. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या डावात 5 धावा, तर दुसऱ्या डावात तो खाते न उघडता परतला. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांनी अपेक्षा भंग केला. कागिसो रबाडाने पहिल्या डावात 59 धावांत 5 बळी घेत दुसऱ्या डावातही महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या.
भारतीय गोलंदाज ठरले अपयशी
भारताचा पहिला डाव 245 धावांत गुंडाळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोलंदाजांकडून चांगली गोलंदाजी अपेक्षित होती. भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले आणि दक्षिण आफ्रिका संघाने 400 च्या वर धावा केल्या. डीन एल्गरने 185 धावा केल्या तर मार्को जॅन्सननेही नाबाद अर्धशतक झळकावले.