Jitendra Awhad : ठाणे : शहापूर तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे, असे राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. संपूर्ण मुंबईला शहापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. सत्तेच्या धुंदीत आणि कलेक्शनच्या नादात शासनाला याकडे पाहायला वेळच नसल्याची टीका राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.
जितेंद्र आव्हाड नेमक काय म्हणाले?
या सरकारने मोठ्या प्रमाणात आमदारांना निधी दिला असताना शहापूर तालुक्यात पाण्याची टंचाई भासत आहे. यंदा पावसाचा प्रमाण कमी झाला आहे त्यामुळे वेळे आधीच विहिरी आटल्या आहेत. शहापूर तालुक्यातील अनेक भागात पाण्याची भीषण टंचाई आहे. मात्र शासनाला या सर्वांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या बस स्थानकात कधीही दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती असताना त्याचे बांधकाम रखडले आहे. तर दुसरीकडे खर्डी गावात उपजिल्हा रुग्णालय बांधून पूर्ण झाले असताना मंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी हे रुग्णालय वाट पाहत आहेत. मंत्री महोदयांकडे उद्घाटनासाठी वेळ नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. सत्तेच्या धुंदीत आणि कलेक्शनच्या नादात शासनाला तहानलेल्या जनतेकडे पाण्यासाठी वेळच नाही.
राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचा दौरा केला. यावेळी शहापूर तालुक्यातील माळ, भिवळवाडी गावांना भेट देऊन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शहापूरमधील पाणी टंचाईच्या भागाची पाहणी केली. पाण्यासाठी वनवन भटकणाऱ्या नागरिकांनी त्यांची व्यथा जितेंद्र आव्हाड यांना सांगितली.