यवत / राहुलकुमार अवचट : ‘तुम्हाला कर्ज देतो’, असे आमिष दाखवून ८ लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथील खरेदी-विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला तुम्हाला कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवले. याबदल्यात तुमच्या जमिनीचे साठेखत करून द्या व साठेखतासाठी येणारा खर्चाची निम्मी रक्कम अगोदर द्या, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
तसेच १० फेब्रुवारी ते ९ डिसेंबर या काळात यवत येथील बडोदा बँकेच्या खात्यावर ७ लाख रुपये व रोख १ लाख ७५ हजार रुपये घेऊन कोणत्याही प्रकारचे कर्ज न देता व जमिनीचे साठेखत करून दिले नाही. यामुळे दिलेली रक्कम पुन्हा परत मागितली असता जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करेल, अशी धमकी देत ८ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद सोमनाथ यशवंत रानावत (रा. लक्ष्मी नारायण नगर एरंडवणे, पुणे) यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली.
दरम्यान, या फिर्यादीवरून बालाजी बळीराम घोडके (रा. आनंदग्राम सोसायटी, यवत, ता. दौंड, जि.पुणे) याच्या विरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली. आरोपीने अशाचप्रकारे बऱ्याच लोकांची फसवणूक केल्याची शक्यता असून, याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख हे करत आहेत.