लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबता थांबेना. मागील वीस दिवसांपूर्वी एमआयटी कॉनेर येथे झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत तीन तासांच्या आत दोन मोठे अपघात झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) रात्री उघडकीस आले आहे. या अपघातात एमआयटीतील दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर एक रिक्षाचालक किरकोळ जखमी झाला आहे.
शिवराज शिंदे (वय १९) व ओम वणवे (वय १९, दोघेही सध्या रा. लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर किरकोळ जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव अद्याप समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एच. पी. गेट क्रमाक ३ च्या समोर ट्रक, कार व रिक्षाचा पहिला अपघात झाला. हा अपघात बुधवारी (ता. २७) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात रिक्षाचालक किरकोळ जखमी झाला आहे.
दुसरा अपघात साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात अर्टिगा कार पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघाली होती. कार कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम मिसळच्या समोर यु टर्न घेत होती. तेव्हा आयटीतील दोन विद्यार्थी पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने चालले होते. तेव्हा दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटला आणि समोरच्या अर्टिगाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एमआयटीत शिक्षण घेत असलेले शिवराज शिंदे व ओम वणवे हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, हवालदार महेश करे, योगेश कुंभार, बालाजी बांगर व अजिंक्य जोजारे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दोन्ही जखमी विद्यार्थ्यांवर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुढे येत आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबेना
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन या दरम्यान अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. मागील ११ महिन्यांच्या कलावधीत झालेल्या अपघातांमध्ये ६० जणांनी आपला जीव गमावला आहे, तर सुमारे ६१ जण गंभीर जखमी झाले आहेत. भीषण अपघातांमध्ये काहींना आपले अवयवदेखील गमवावे लागले आहेत. तसेच छोटे-मोठे शेकडो अपघात या महामार्गावर सातत्याने होत आहेत. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबेना, असे म्हणण्याची वेळ पूर्व हवेलीतील नागरिकांवर आली आहे.