राहुलकुमार अवचट
यवत : लडकतवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात घरापुढे बांधलेली कालवड ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २४) मध्यरात्री घडली आहे. लपायला जागा मुबलक असल्याने बिबट्यांचा नेहमीच संचार असतो. वनकर्मचा-यांनी पंचनामा केला असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लडकतवाडी (ता. दौंड) येथील शेतकरी मधुकर देवराम होले यांच्या गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना घडली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून गाईपालन केले आहे. लडकतवाडी व नाथाचीवाडी मध्ये उसाचे मोठ्या प्रमाणावर शेती असुन या ठिकाणी बिबटयाचा वावर मोठ्या प्रमाणात होऊ लागला असून त्याचा वावर मनुष्य वस्तीत देखील वाढला आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वासराचा मृत्यु झाला असुन हल्ल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे.
उंडवडी, लडकतवाडी, नाथाचीवाडी या परिसरातअनेक दिवसांपासून बिबट्या तळ ठोकून आहे. परिसरातील शेतक-यांची अनेक पाळीव जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. जनावरांवर हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे रान जनावरे नाहीशी झाली पण आता बिबट्या लोकवस्तीमध्ये शिरकाव करू लागला आहे. शेळी, मेंढी, गाई, कुत्रे यांच्यावर बिबट्या हल्ले करत आहे. याचा वेळीच बंदोबस्त वनविभागाने करण्यासाठी या परिसरामध्ये पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
घटनास्थळी वन विभागीय अधिकारी नानासाहेब चव्हाण यांनी भेट देऊन मृत वासराचा पंचनामा केला असुन नागरिकांनी आपले गोठे बंदिस्त करून घ्यावे, रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी जाताना एकटे न जाण्याचे तसेच रात्रीच्या वेळी फटाके फोडावेत असे आवाहन केले.
दरम्यान, दौंड वनपरीक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे म्हणाल्या, “वनविभागाकडे पिंजऱ्यांची कमी असुन वरिष्ठ कार्यालयाकडे पिंजऱ्याची मागणी केली आहे. याचा पाठपुरावा करत असुन पुणे कार्यालयाकडून पिंजरा उपलब्ध झाल्यावर या भागात पिंजरा बसवून बिबट्या जेरबंद करण्यात येईल असे यांनी सांगितले.”