पुणे : नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून प्रस्तावित दुमजली उड्डाणपूल वाघोलीऐवजी रामवाडीपर्यंत करण्यात येणार आहे. शास्त्रीनगर चौकात महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे येरवड्यापासून वाघोलीपर्यंतचा प्रवास वेगवान होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि हा रस्ता वाहतूक नियंत्रक दिवेमुक्त करण्यासंदर्भात वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी ही बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आले.
शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, अशी सूचना पवार यांनी केली. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून शिरूर ते वाघोली असा दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. हा उड्डाणपूल विमाननगर-रामवाडीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प आराखडा करण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करण्यात आली.
दरम्यान, रखडलेल्या शिवणे-खराडी रस्त्याबाबतही चर्चा झाली. या रस्त्यासाठी तातडीने भूसंपादन करावे. धानोरी, संतनगर, फाईव्ह नाईन चौक ते धानोरी आणि विश्रांतवाडी येथील पर्यायी रस्ते पूर्ण करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करावी आणि त्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावेत, असेही पवार यांनी सांगितल्याचे आमदार टिंगरे या वेळी स्पष्ट केले.