पुणे : नाताळ सणानिमित्त महात्मा गांधी रस्ता परिसरात वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. वाढती गर्दी विचारात घेऊन सोमवारी (ता. २५) सायंकाळी सातनंतर लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. गरज भासल्यास रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
लष्कर परिसरात नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यासाठी शहरातील नागरिक लष्कर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे आवश्यकता भासल्यास महात्मा गांधी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, या भागातील वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे वळविण्यात येणार आहे.
तर सोमवारी सायंकाळी सातनंतर महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौकातील वाहतूक कुरेशी मशिद, सुजाता मस्तानी चौकातून वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौकातून अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक तीन तोफा चौकातून वळविण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून मोहंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक इस्ट स्ट्रीटमार्गे स्व. इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.