पुणे : राज्यातील शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या हजारो उमेदवारांना शिक्षण आयुक्तालयाने आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील शिक्षक भरतीची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार याकडे सर्व उमेदवारांच लक्ष लागून आहे. अशातच आता भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले असून २८ डिसेंबरला किंवा ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यात ३० हजार शिक्षकांची पदे रिक्त
राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे तीस हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तसेच खासगी अनुदानित संस्थांमधील सुमारे वीस हजार पदे रिक्त आहेत. मात्र, रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. जिल्हा परिषदेतील २० ते २१ हजार आणि खासगी संस्थांमधील १८ हजार अशा तब्बल ३८ – ३९ हजार जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज्यात पेसा क्षेत्र असलेल्या १३ जिल्ह्यांत एसटी संवर्गाच्या सुमारे ६ हजार जागा आहेत. परंतु, राज्यात त्यासाठी केवळ २५०० उमेदवार उपलब्ध असल्याचे शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून आढळून आले. त्याचप्रमाणे गणित विषयात टीईटी उत्तीर्ण उमेदवार मिळत नसल्याने या जागासुद्धा रिक्त राहत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतरही एसटी संवर्गाचे आणि गणित विषयाचे उमेदवार मिळाले नाही तर शिक्षकांची हजारो पदे रिक्त राहणार आहेत.