Mumbai-Pune Express Way : सलग दुसऱ्या दिवशी देखील मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पुण्याच्या दिशेने जाताना वाहतूक रखडली आहे. अडोशी टनेलच्या अगोदर पासून अमृताजन ब्रिज पर्यंत आणि पुण्याच्या दिशेला खंडाळाकडे 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सह जुन्या मार्गांवर खोपोली हद्दीत बोरघाटात शेकडो वाहने बंद अवस्थेत उभी आहेत.
दरम्यान, सलग सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळी निघाले आहेत. मात्र एकाच वेळी वाहनांची संख्या वाढल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर शनिवारी दुपारपासूनच वाहनांची संख्या वाढली होती. वीकेंड आणि नाताळ सणांच्या सलग सुट्ट्यांमुळे बाहेर फिरायला निघालेले मुंबईकर मात्र घाट रस्त्यात अडकले. एक्सप्रेस वे वरील बोर घाट आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील घाट रस्त्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
ट्रॅफिक जाममुळे नागरिकांना अनेक समस्यांना समोरं जावं लागत आहे. अनेक वाहनांचे इंजिन गरम झाल्यामुळे वाहने बंद पडली आहेत. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.