मुंबई: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात तब्बल 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पुण्याच्या दिशेने होणारी वाहतूक थांबली आहे. अडोशी टनेलच्या अगोदरपासून अमृतांजन ब्रिजपर्यंत आणि पुण्याच्या दिशेला खंडाळाकडे 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेसह जुन्या मार्गावर खोपोली हद्दीत बोरघाटात शेकडो वाहने बंद आहेत.
दुसरीकडे, बोरघाटात शेकडो संख्येने प्रवासी वाहने बंद आहेत. जुन्या मुंबई पुणे मार्गांवर पुण्याकडे जाताना शिंग्रोबाच्या अगोदरपासून मोठ्या प्रमाणात वाहने बंद आहेत. मोठ्या संख्येने महिला, लहान मुले रस्त्यावर बसूनअसून टोविंग वॅन, मेकॅनिकच्या प्रतीक्षेत शेकडो प्रवासी आहेत.
शनिवार आणि रविवारला जोडून तसेच ख्रिसमस सुट्टी आल्याने सलग सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे शनिवार सकाळपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोल नाका व खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अतिशय संथ गतीने वाहने पुढे सरकत होती. खंडाळा घाटाचा परिसर चढणीचा असल्याने अनेक वाहने गरम होऊन बंद पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे.