पुणे : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधीपक्षाच्या जवळपास दीडशे खासदारांचं लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. यात सुप्रया सुळेंचाही समावेश आहे. ज्यांना नुकताच संसदपटूचा सन्मान मिळाला. त्याचं निलंबन झाल्याने राजकीय वर्तुळात सगळेच आवाक झाले आहेत. मात्र, सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांच प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळेंच्या निलंबनाबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत थेट शब्दात उत्तर दिलं. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. “फक्त सुप्रिया सुळेंचं निलंबन झालं नाही. अनेक खासदारांचं निलंबन झालं आहे. जेव्हा खासदार किंवा आमदार विधिमंडळांत, लोकसभेत आणि राज्यसभेत काम करत असतात. त्यावेळी कुठल्या तरी नियमाचा भंग झाल्यास त्याप्रमाणे कारवाई केली जाते. त्यानुसारच निलंबनाची कारवाई झालेली आपण पाहिली आहे.”
एवढ्या मोठ्या संख्येनं खासदारांचं निलंबन झाल्यामुळे देशभरातून भाजपवर टीका केली जात आहे. निलंबन केलेल्या खासदारांमध्ये अनेक नामांकीत खासदारांचा समावेश आहे. “तिथे काय घडलं? हे मला माहीत नाही. विधानसभेत काय घडलं? हे विचारलं असतं तर मी सांगितलं असतं. माझ्या माहितीप्रमाणे संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान करण्यात आला. उपराष्ट्रपतीही अतिशय व्यवस्थितपणे आपलं स्वत:चं काम पार पाडत असतात. असं असताना तिथे जी काही घटना घडली, त्यामुळे त्यांच्यावर ती कारवाई झाली आहे.”
पुढे बोलताना त् म्हणाले की, “राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री असतील, ही महत्त्वाची पदं आहेत. एवढ्या मोठ्या भारतात लोकशाही पद्धतीने निवडून गेलेले ते लोक असतात. ते आपापलं काम योग्य पद्धतीने करत असतात. कारण ज्यावेळी एवढा मोठा समाज त्यांच्या पाठिशी उभा राहतो आणि त्यांच्या विचारांच्या लोकांना निवडून देतो. याचा अर्थ त्यांनी कुठेतरी जनाधार मिळवलेला असतो.”