Sunil Kedar News : काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हा बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. या बँक घोटाळा प्रकरणात कोर्टाने शुक्रवारी केदार यांना यांना दोषी ठरवत ५ वर्षांच्या कारावासाची आणि १२.५० लाख रुपये शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता केदार यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले आहेत. तसेच सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याबाबत आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. कायद्याने आमदारांना २ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी रद्द होते. नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले आहेत, त्यानंतर केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या कोर्टात आहे.
राज्याचे माजी पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (एनडीसीसी) कोट्यवधी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली. तर इतर तीन आरोपी निर्दोष सुटले आहेत. याप्रकरणी कोर्टाने सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता केदार यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.