लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ६० कोटी ६० लाख रुपयांच्या निधीची शासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती थेऊरच्या सरपंच शितल शरद काकडे यांनी दिली.
पुणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता वैशाली अवटी यांच्या हस्ते जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गतचे मंजुरीचे पत्र सरपंच शितल काकडे यांना देण्यात आले आहे. यावेळी उपसरपंच आप्पासाहेब काळे, सदस्य विठ्ठल नाना काळे, युवराज काकडे, राहुल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शरद काकडे, सुखराज कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, गणेश रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
थेऊर येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा दरडोई खर्च हा विहीत निकषापेक्षा जास्त आहे. तसेच योजनेची किंमत रू ५ कोटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सदर नळ पाणी पुरवठा योजनेस मंजूरी देण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग पुणे यांनी संदर्भ क्रमांक ०९ अन्वये शासनाच्या मान्यतेकरीता सादर केला होता.
प्रस्तुत नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे तसेच सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी समितीच्या दिनांक १० जून २०२२ रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ६० कोटी ६० लाख (साठ कोटी, साठ लाख) (ढोबळ) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुसार थेऊर येथील ५५ लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या रुपये ४५१० इतका दरडोई खर्च असलेल्या नळ पाणी शासन निर्णय पुरवठा योजनेच्या ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. योजना प्रत्यक्षात पूर्ण झाल्यावर संबंधित कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण/जिल्हा परिषद व संबंधित ग्रामपंचायतीचे अधिकारी यांनी योजनेची संयुक्तपणे पाहणी आयोजित करावी आणि अशा पाहणीत कोणतेही दोष आढळून आल्यास योजना ताब्यात देण्यापूर्वी ते सुधारण्यात यावेत. २ रा योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर किमान १ वर्षे योजना चालविणे कंत्राटदारावर राहील. असे परिपत्रकात म्हटले आहे.
पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर ती संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याकडून योजना प्रत्यक्षात पूर्ण झाली या आशयाची सुचना मिळाल्यानंतरच्या एक महिन्याच्या आत योजना ताब्यात घेण्यास संबंधित ग्रामपंचायत जबाबदार राहील. प्रस्तुत नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे तसेच सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी समितीच्या दिनांक २४ मे २०२२ रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे.
याबाबत थेऊरच्या सरपंच शितल शरद काकडे म्हणाल्या, “सरपंचपदी निवड झाल्या पासून गावातील पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण दूषित पाण्यामुळे पाणी कमी पडत होते. आमचे जेष्ठ नेते तात्यासाहेब काळे, हिरामण काकडे, गावाचे उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच व सदस्याया सर्वांचे सहकार्य घेऊन जल जीवन योजना मंजूर करून घेण्यात आली. पुढील काही दिवसात काम सुरू होऊन २ वर्षे च्या आत ही काम पूर्ण करून प्रत्येक घराला नळ द्वारे शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल.”
याबाबत साखर कामगार संघटनेचे राज्य समन्वयक तात्यासाहेब काळे म्हणाले, “गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कायम नवीन स्रोत तयार केले गेले, पण पुढील ५० वर्षाचा विचार करता कायमस्वरूपी ठोस योजनेची गरज होती त्यासाठी जल जीवन योजनेसाठी प्रयत्न केले. व त्याला यश आले.”
याबाबत हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे म्हणाले, “वाढणारी लोकसंख्या चा विचार करून कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना मंजुरी साठी जे प्रयत्न केले त्याला यश आले लवकरच योजनेचे काम सुरू होईल.”