नवी दिल्ली: 2030 पर्यंत भारतात दरवर्षी 1 कोटी इलेक्ट्रिक वाहने (EVs) विकली जातील, अशी अपेक्षा आहे. यामुळे सुमारे पाच कोटी रोजगार निर्माण होतील, असा अंदाज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. 19 व्या ईव्ही एक्सपो 2023 ला संबोधित करताना ते म्हणाले, “वाहनांच्या आकडेवारीनुसार, भारतात 34.54 लाख ईव्ही नोंदणीकृत आहेत.”
भारतामध्ये जगातील सर्वात मोठा ईव्ही उत्पादक बनण्याची क्षमता आहे. स्वच्छ ऊर्जा उत्पादनात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी भर दिला.
सरकारचे नियोजन काय आहे?
गडकरी म्हणाले की, सध्याची प्रदूषक वाहने हायब्रीड आणि पूर्ण ईव्हीमध्ये बदलण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यासाठीचे नियम निश्चित करण्यात आले असून तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की सार्वजनिक वाहतूक आणि लॉजिस्टिकमध्ये ईव्हीला वेगाने प्रोत्साहन देण्याचा सरकारचा मानस आहे.
केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारेही लोकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत आणि यासाठी विविध प्रकारच्या सवलती देत आहेत. यामध्ये सबसिडी, कपात किंवा नोंदणी फी माफ करणे इत्यादींचा समावेश आहे.