पुणे : नात्यातील संवाद बिघडणे, राग, संताप, दुःख, एकाकीपणा, बेवफाई, कमी झालेला आत्मसन्मान आदी कारणांमुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत जात असल्याचे आपल्या ऐकण्यात आले असेल. अनेकदा समुपदेशनानंतर घटस्फोटाची प्रकरणे मिटल्याचेही आपण ऐकले असेल. मात्र, म्हणतात ना ‘पुणे तिथे काय उणे?’ याच पुण्यात घटस्फोटाचे एक आगळेच प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पती-पत्नीने संगनमताने घटस्फोटाचा निर्णय घेतला. मात्र, लग्नापूर्वी भेट दिलेला आफ्रिकन ग्रे पोपट मला परत दे, तरच मी घटस्फोटाला तयार होईन या मुद्द्यावर पती अडून बसला. तर पत्नीचा जीव त्या पोपटात अडकल्याने पत्नी काही पोपट परत करायला तयार होईना… अखेर समुपदेशकाने मध्यस्थी करून पोपट पतीच्या ताब्यात देण्यास पत्नीला राजी केले आणि बराच काळ रखडलेले घटस्फोट प्रकरण अखेर निकाली निघाले…
घटस्फोटाच्या या आगळ्या प्रकरणात वकील भाग्यश्री सुभाष गुजर यांनी पतीची कायदेशीर बाजू हाताळली. या प्रकरणी बोलताना अॅड. गुजर म्हणाल्या की, ११ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यातील रजिस्ट्रार कार्यालयात दोघांनीही नोंदणी पद्धतीने विवाह केला. मात्र, लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांच्यात खटके उडू लागले. अखेर पत्नीने विभक्त होण्यासाठी डिसेंबर २०२२ रोजी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. यानंतर हे प्रकरण समुपदेशनासाठी पाठिवण्यात आले, तेव्हा एक अनपेक्षित अन् धक्कादायक बाब समोर आली.
अॅड. गुजर म्हणाल्या की, विवाहापूर्वी पतीने पत्नीला आफ्रिकन ग्रे जातीचा पोपट भेट दिला होता. या पोपटाचा दोघांनाही चांगलाच लळा लागला होता. पोपटाशिवाय दोघांनाही करमत नसे. मात्र, संसारात दोघांमध्ये सतत मतभेद होऊ लागले. एकमेकांशी न पटल्याने वाद विकोपाला जाण्याचे प्रसंगही उद्भवले. अखेर एकमेकांना कंटाळलेल्या या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांनाही लळा लावणारा तो पोपट कोण घेणार, यावरून वाद सुरू झाले. आफ्रिकन ग्रे जातीचा हा पोपट परत करावा यासाठी पती अडून बसला. त्याशिवाय घटस्फोट देणार नसल्याचे ठाम मत पतीने मांडले.
अखेर समुपदेशकाने दोघांना एकत्र राहण्यासाठी समुपदेशन न करता, पत्नीचे समुपदेशन करून पोपट पतीला देण्यास राजी केले. पुन्हा पुन्हा समुपदेशन केल्यानंतर पत्नीने पोपट परत करण्याचे मान्य केले आणि त्यानंतर एक घटस्फोट मंजूर झाला, अशी माहिती भाग्यश्री गुजर यांनी दिली.