लहू चव्हाण
पाचगणी : कृतियुक्त शिक्षणातून, कलेतून ज्ञानप्राप्ती, हे उद्दिष्ट घेऊन अध्ययनाचा अनुभव देणाऱ्या बिलिमोरिया निवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी ‘आरंभ’- सेलिब्रेशन ऑफ भारत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बिलिमोरिया हायस्कूलच्या व्यवस्थापकीय संचालक आदिती गोराडिया, मुख्याध्यापक विशाल कानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बिलिमोरिया हायस्कूलच्या मैदानावर शनिवारी (ता. २३) होणाऱ्या या कार्यक्रमात धरोहर, रणांगण, स्वादोत्सव, ग्राम जीवन व कला सेतू असे विभाग असणार आहेत. भारतातील पहिल्या दहा निवासी शाळांमधील ही शाळा विद्यार्थ्यांची संकल्पना स्पष्टीकरण, अध्ययन निष्पत्ती यावर आधारित शिक्षणावर भर देत आहे. सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारलेला स्वतःचा स्वतंत्र पाठ्यक्रम शाळेने तयार केला आहे. तांत्रिक शिक्षण, कला व जीवन कौशल्यांचा, क्रीडा गुणांचा विकास यावर भर देणाऱ्या या शाळेने आरंभ महोत्सवातून भविष्यासाठी दर्जेदार शिक्षणात ‘इंडियाज् रोल इन द वर्ल्ड’ ही मुख्य संकल्पना ठेऊन शैक्षणिक उपक्रमांची निर्मिती केली आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन पियुष कामदार व अरुणभाई गोराडिया यांनी केले आहे.