पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कधी काय निर्णय घेतील, हे सांगणे कठीण आहे. त्यांच्या निर्णयाचा तर्क लावताना बऱ्याच वेळा राजकीय पंडितांचाही पराभव होतो. दरम्यान, मंगळवारी (19 डिसेंबर) दिल्लीत झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या चौथ्या बैठकीनंतर आता दोन गोष्टींवरून नितीशकुमार यांचा पक्ष जेडीयू पुन्हा धक्कादायक निर्णय घेऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.
नितीश कुमार लोकसभेच्या जागावाटपाबाबत गंभीर आहेत. लोकसभेच्या जागावाटपाचा जो काही फॉर्म्युला आहे, तो लवकरात लवकर ठरवावा, अशी नितीशकुमारांची इच्छा आहे. मंगळवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीतही तसे होऊ शकले नसले, तरी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या चेहऱ्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे केल्याने नितीशकुमार यांना नक्कीच धक्का बसला असेल. यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनीही संमती दर्शवली. नितीश कुमारांनी कधीच इच्छा व्यक्त केली नाही. पण, नितीश कुमारपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही, असे जेडीयू नेते सतत सांगत आहेत.
नितीश कुमार यांनी अनेकदा धक्कादायक निर्णय घेतले आहेत. याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. कारण जेडीयूने 29 डिसेंबरला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावल्यामुळे ही चर्चा आहे. यापूर्वी केवळ राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली जात होती. मात्र, आता दुसरीकडे राष्ट्रीय परिषदेचीही बैठक बोलावण्यात आली आहे. या दोन्ही बैठकांमधून नितीशकुमार पुन्हा काही मोठे करणार आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
29 डिसेंबरची बैठक आधीच ठरलेली होती. मात्र, मंगळवारी राष्ट्रीय परिषदेची बैठकही बोलावण्यात आली आहे. सध्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 99 सदस्य आहेत तर राष्ट्रीय परिषदेत 200 सदस्य आहेत. नितीश कुमार यांना संयोजक आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मागणी पक्षाकडून अनेकदा करण्यात आली होती. नितीश स्वत: मात्र याचा इन्कार करत आहेत. आता जागावाटपाबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी नितीश यांनी केली आहे.
दोन्ही बैठका एकाच दिवशी होणार आहेत
29 रोजी सकाळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर लगेचच कार्यकारिणीची बैठक होणार आहे. दुपारी राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार आहे. अशा स्थितीत या दोन बैठकीनंतर पक्षाकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहायचे आहे.