मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणात कोर्टाने निर्णय दिला आहे. राणा दाम्पत्याची गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई कोर्टाने फेटाळली आहे. राणा दाम्पत्याला हा मोठा धक्का मानला जात आहे.
‘मातोश्री’बाहेरील हनुमान चालीसा पठण आंदोलनप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्याने मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता ती याचिका कोर्टाने फेटाळली. खार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा हे आरोपी आहेत.
एफआयआर दाखल होण्यापूर्वीच केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा राणांचा दावा होता. परंतु, कोर्टाने हा दावा फेटाळला. अतिरीक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपला निकाल राखून ठेवला होता. तो निकाल मंगळवारी जाहीर केला.
तसेच नवनीत राणा आणि रवी राणा यांना पुढील सुनावणीत कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देखील दिले आहेत. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालात 5 जानेवारीला आरोप निश्चितीची प्रक्रिया होणार आहे. दोषमुक्ती यचिका फेटाळल्यानंतर कोर्टाकडून खटल्याच्या कारवाईला सुरूवात झाली आहे.