राजेंद्रकुमार शेळके
पुणे : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागपुरात हिवाळी अधिवेशनात आलेल्या कलावंतांनी संगिताच्या माध्यमातून आपल्या मागण्या सरकारपुढे मांडल्या. आपल्या मागण्या अनोख्या ढंगाने मांडणाऱ्या कलावंतांना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश अवचार तथा विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र वाहाणे, भंडारा यांच्या नेतृत्वाखाली कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम, नागपूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई प्रदेश, वऱ्हाड, खानदेश, कोकण अशा अनेक विभागांतुन संघटनेचे पदाधिकारी, महिला व पुरुष या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रथम महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांना वंदन करुन धरणे आंदोलनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. हे आंदोलन संगितमय असल्यामुळे येथील उपस्थित जनतेला आकर्षित करणारे ठरले. या वेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहिर सवितराव गजभिये, कव्वाल विनोद इंगळे, कवी-गायक महेंद्र वाहाणे (भंडारा) यांनी आपल्या गितांच्या माध्यमातून गाऱ्हाणे मांडले.
पुढाऱ्यांना उद्देश्यून, ‘तुमच्याजवळ तूप आणि दुधावरची साय, या कलाकारांचं काय?’ अशा प्रकारची गिते सादर करुन त्यांनी कलेच्या माध्यमातून पुढाऱ्यांना वेठीस धरले. गिते सादर केल्यानंतर प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने अधिवेशनात जाऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे पीएसओ सुनिल मित्रा यांना कलावंतांच्या मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व विदर्भ प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस महेंद्र वाहाणे, विनोद इंगळे, शाहिर सवितराव गजभिये, गजानन पाटील, शेषराव कावरखे यांनी केले.
आंदोलनात राज्य महिला अध्यक्षा संगिता ठोंबरे, सविता बाहे, मालता बन्सोड, सुनिता आगलावे, छन्नुताई नंदेश्वर, वनिता रामटेके, ममिता कडव, दीपाली शेंडे, वनिता रामटेके, सुनिता पराते, गिता झापर्डे, लता मते, लिलाधर भोवते, नितेश अवचार, नागोराव हलमारे, उमेश आंबिलढुके, सखाराम राऊत, शाहिर निलकंठ निम्बार्ते आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.