उरुळी कांचन (पुणे) : पशुधन हे शेतकऱ्याची तसेच संपूर्ण देशाचीही संपत्ती आहे. लम्पी आजारास भिऊन जाण्याचे कारण नाही मात्र लसीकरण, विलगीकरण, योग्य वेळी औषधोपचार व सर्व उपाय पशुपालकानी केले तर लम्पी आजार दूर होऊ शकतो असे प्रतिपादन बायफचे व्यवस्थापक डॉ. कदम एच. डी. यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयातील शास्त्र शाखा व नॅक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पशुधनाचे आरोग्य व लम्पी आजाराविषयी उपाययोजना’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. कदम बोलत होते.
या अभियाना अंतर्गत लम्पी आजारा विषयी माहिती शेतकरी कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना तसेच या विद्यार्थ्यांमार्फत उरुळी कांचन परिसरातील शेतक-यांचा सर्व्हे करून या शेतक-यांना लम्पी आजारावरील उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. यावेळी ६० विद्यार्थांनी सहभाग नोंदवला होता.
यापुढे बोलताना डॉ. कदम म्हणाले, ” पशुधनांमध्ये होणाऱ्या लम्पी आजाराची लक्षणे जसे की, ताप येणे, तोंडातून व नाकातून पाणी गळणे, खाद्यसेवनात घट, दुग्ध उत्पादनात घट याविषयी माहिती दिली. तसेच आजारावरील व्यवस्थापनात – स्वच्छता ठेवणे, वारंवार तपासणी करणे, लसीकरण, विविध औषधांचा वापर करणे याबद्दल मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत यांनी पशुधन संवर्धन करा तसेच समस्यांवर मार्ग काढण्याची क्षमता व मानसिकता ठेवून सुरक्षिततेसाठी प्रामाणिक प्रयत्न करा असे सांगितले. तरुणांचे मन तरुण असले पाहिजे आणि आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता असली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान, अभियानाचे संयोजक उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर व नॅक समन्वयक नंदकिशोर मेटे, प्राध्यापक स्वाती मासाळकर, विदया लाळगे, प्रतीक्षा कोद्रे, रोहिणी शिंदे, दिपाली चौधरी, विजय कानकाटे, प्रदीप राजपूत, मोरेश्वर बागडे, विशाल महाडिक, सीमा विसनगरकर हे प्राध्यापक व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. अनुजा झाटे यांनी केले. प्रणिता फडके यांनी आभार मानले.