लोणी काळभोर: रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तुपे वस्ती परिसरातून शनिवारी (ता.१६) अटक केली.
करण प्रकाश घुगे (वय 24, रा. ऐश्वर्या मंदिर झोपडपट्टी, देवी रोड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर पोलिसांना चोरट्याकडून चार गुन्ह्यांची उकल करण्यास यश मिळाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी व घरफोडीच्या घटना वारंवार घडत होत्या. सदर गुन्हे उघडकीस आणून आरोपींना पकडण्याच्या सूचना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले होते.
या गुन्ह्याचा तपास पथकातील पोलिसांना घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार करण घुगे हा उरुळी कांचन येथील तुपे वस्ती येथे आहे, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेली हिरो सिडी डिलक्स दुचाकी व मोबाईल फोन असा ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, आरोपी करण घुगे याला ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केली असता, आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ गुन्हे व म्हसरूळ पोलीस ठाणे (नाशिक शहर) हद्दीतील 1 अशा चार गुन्ह्यांची पोलिसांना कबुली दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करत आहेत.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार संभाजी देवीकर, शैलेश कुदळे, योगेश पाटील यांच्या पथकाने केली.