सागर जगदाळे
भिगवण : राज्य सरकारने लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाद्रपद बैलपोळा सणानिमित्त गावातील बैलांना एकत्र करण्यास बंदी घातली आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे बैलपोळ्याच्या सणाला बैलांच्या मिरवणूक काढण्यास बंदी होती. आता यावर्षी लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याने बंदी घालण्यात आली आहे.
बैलपोळा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या मुळे आदीच दोन वर्षे बैलपोळा सण होऊ शकला नाही. त्यामुळे यावर्षी बैलपोळा सण बळीराजाने उत्साहात साजरा करून बैलांच्या ऋणातून मुक्त होयचे असे ठरविले होते. परंतु नव्यानेच गाई, बैल यांच्यावर जास्त परिणामकारक ठरणाऱ्या लंपी या संसर्गजन्य रोगाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची आशा पूर्णपणे धुळीस मिळाली आहे.
रविवारी (ता. २५) भाद्रपद बैलपोळ्याचा सण साजरा होत आहे. लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रण व प्रतिबंधासाठी गुरे म्हशींचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा वा प्रदर्शन आयोजित करणे यासाठी बंदी घालण्यात आली आहे. भिगवण परिसरातीळ गावात भाद्रपद महिन्याच्या अखेरीस अमावस्येला बैलपोळा साजरा करण्याची परंपरा आहे. गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने बैलपोळा साजरा झाला नाही.
बैलपोळा सण या वर्षी चांगल्या पद्धतीने साजरा होईल असे वाटले होते, म्हणून बैल सजविण्यासाठीचे लागणारे साहित्य घुंगरमाळा, शेम्बी, झूल, रंगाचे डबे, चवर, बाशिंगे, वेसणदोरे, कासरा, गोंडे, फुले, ब्यागडे, हिगळ, चाबोक, पितळी साकळ्या यांची खरेदी केली. मात्र यंदा लम्पी आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बैलपोळा साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान, बैल पोळा सणानिमित्त गावातील बैल मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन त्यांची मिरवणूक निघण्याची शक्यता आहे व असे झाल्यास आपल्या गावात सम्मी चर्म रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु होईल, त्यामुळे तालुक्यातील सर्व गावात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैल पोळा सना निमित्त गावातील बैल एकत्र आणण्यास बंदी करण्यात येत आहे.
याबबत इंदापूर तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी राम शिंदे म्हणाले, “लम्पीच्या नियंत्रण व प्रतिबंधासाठी जनावरे, गाय-म्हशींचा बाजार भरवणे, प्राण्याच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन यावर बंदी घालण्यात आली आहे. पशुधनाच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीने यासंदर्भात बोर्ड, फ्लेक्स किंवा दवंडी देऊन सर्व पशुपालकांना अवगत करण्याचे आवाहन केले आहे.