पुणे : किरकोळ घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (ता. २१) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भोसरी येथील गंधर्वनगरी येथे हि घटना घडली आहे.
शांताबाई शिवराय अहिवळे (वय-५२) असे खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर शिवराय तुकाराम अहिवळे (वय – ६०, दोघेही रा. गंधर्व नगरी तापकीर नगर मोशी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत मुलगा सचिन शिवराय अहिवळे (वय- ३६, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिवळे दाम्पत्य हे त्यांचा मुलगा व नातू यांच्यासह सदर ठिकाणी राहत होते. शिवराय हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. त्यांचे आणि पत्नी शांताबाई यांच्यामध्ये सतत घरगुती कारणावरुन वाद होत होते. बुधवारी सकाळी त्यांचा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला. त्यावेळी त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.
दरम्यान, तुकाराम याने पत्नीचा सुरुवातीला दोरीने गळा आवळला. त्यानंतर डोक्यात दगडी पाटा घालून खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा दुपारी दीडच्या सुमारास घरी आला असता दरवाजा आतून बंद होता. काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.