दिनेश सोनवणे
दौंड : पुणे – सोलापूर महामार्गावर दौंड पोलिसांचा थरारक पाठलाग करून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या पिकअपसह तब्बल १९ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कारवाई खडकी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. २१) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास केली आहे.
नामदेव मधकुर लवटे (वय २७ रा. निजामपुर, कोकरे मळा ता. सांगोला जि. सोलापुर) व दत्तात्रय पांडुरंग खांडेकर (रा. खैराय, सिध्दोबा मंदीरा जवळ ता. जत जि.सांगली) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पोलीस गस्त घालत होते, तेव्हा पोलिसांना सोलापुर बाजुकडुन पुणेच्या दिशेने जात असलेला एक महेंद्रा पिकअप संशयास्पद आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने पोलिसांना पाहताच पिकअप भरधाव वेगाने पळवू लागला. पोलिसांनी पिकअपचा पाठलाग करून, पिकअपला खडकी गावच्या हद्दीतील हॉटेल अकांक्षा समोर मोठ्या शिताफीने पकडले.
त्यानंतर पोलिसांनी वाहन चालकास ताब्याते घेवून वाहनामध्ये काय आहे? असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या हौदयामध्ये गोण्या दिसुन आल्या. गोण्याची पाहणी केली असता, ६ गोण्या मध्ये विमल गुटखा , २२ गोण्या मध्ये छोटा विमल गुटखा, ६ गोण्यामध्ये तंबाखु असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी या दोघांना ताब्यात घेत महेंद्रा बोलेरो पिकअप सह १८ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, आरोपी नामदेव लवटे आणि दत्तात्रय खांडेकर यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात बेकायदा गुटखा साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी अन्नसुरक्षा व अन्न व औषध प्रशासन व अन्नपदार्थ बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास पोलीस हवालदार बी.आर.बंडगर करीत आहेत.
हि कारवाई पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली रावणगाव पोलीस चौकीचे पोलीस हवालदार बी.आर. बंडगर, पोलीस नाईक गोरख मलगुंडे, एन. एस. भागवत, एस. टी. डाळ व कुरकुंभ पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार एस. एम. शिंदे, पोलीस नाईक एम. एम. पवार यांच्या पथकाने केली आहे.