छत्रपती संभाजीनगर: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हिंसाचार प्रकरणामध्ये बीडच्या गेवराई येथील ऋषिकेश बेद्रे याच्यासह अन्य तिघा जणांना अंबड पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी उच्च न्यायालयाकडून ऋषिकेश बेद्रे याला अटी शर्तीवर जामीन देण्यात आला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचकल्यावर आणि तीन महिने बीडसह जालना जिल्ह्यात प्रवेश न करण्याच्या अटीवर न्या. चपळगावकर यांनी जामीन मंजूर केल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. सकपाळ यांनी दिली.
ऋषिकेश बेद्रे याच्यावर जालना जिल्ह्यातील आंतरवली येथे मराठा आंदोलनात पोलिसांवर दगडफेक झाल्याप्रकरणात गुन्हा दाखल आहे. पोलीसांवर केलेल्या दगडफेकीच्या ३०७ कलमांतर्गत गुन्ह्यात जमीन मिळाला आहे. दरम्यान ऋषिकेश बेद्रे विरुद्ध पिस्टल बाळगल्याप्रकरणीही एक गुन्हा दाखल आहे. त्यावर अद्याप कुठे अपील करण्यात आले नाही. २४ नोव्हेंबर रोजी बेद्रे याला विविध कलमांतर्गत गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती.