Mumbai : राज्याची राजधानी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणरहित आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी बीएमसीचे प्रयत्न सुरु आहेत. कबुतर हा पक्षी श्वसनाचे आजार आणि समाजात अस्वच्छता पसरवते असं समजलं जातं. यामुळे कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या नागरिंकावर कारवाई करण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे.
दरम्यान, कबुतरांसाठी ठरवून दिलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त रस्ते आणि पदपथांवर बेकायदेशीरपणे कबुतरे चारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. बीएमसी ही जबाबदारी मार्शल्स यांच्याकडे सोपवत असून जे कबुतरांना रस्ते आणि पदपथांवर बेकायदेशीरपणे खाद्य टाकत आहे, अशा नागरिंकावर 100 ते 500 रुपयांपर्यंत दंड आकारू शकतात. अशी माहिती बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने दिली.
महालक्ष्मी, दादर, माहीम आणि सीएसएमटी या भागात कबुतर खाना असताना देखील अनेक नागरिक फूटपाथ, रस्ते आणि मोकळ्या जागेवर पक्षांना खाद्य टाकतात यामुळे परिसरात कबुतरांचा मोठा थवा जमा होतो. यामुळे उपद्रव निर्माण होतो. अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
मुंबईतील वायू प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी, बीएमसीने शहरातील धुळीचा निपटारा करण्यासाठी सत्तावीस उपाय लागू केले आहेत. हे नियम प्रभाग स्तरावर लागू केले जातात. बीएमसी आता बेकायदेशीरपणे कबुतरांना खाद्य देणाऱ्यांना लक्ष्य करत आहे.
‘कबूतरांच्या विष्ठेमुळे आजार पसरतात आणि त्यांच्या पिसांतील कणांमुळे दमा आणि फुफ्फुसाचे आजार यांसारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात.’ वैद्यकीय सल्लागारांनी मानवी वसाहतींपासून दूर कबूतर खाणे प्रस्थापित करण्याची सूचना केली आहे. असं बीएमसी अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
मुंबई शहर स्वच्छ बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईकरांवर कारवाई करण्यासाठी बीएमसीने नुकतेच मार्शल नेमण्याचा निर्णय घेतला आहे. वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था आणि कंत्राटदारांवरही मार्शल देखरेख ठेवतील आणि त्यांच्यावर देखील कारवाई करतील. अशी माहिती बीएमसी अधिकाऱ्याने दिली.