नागपूर : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारकडून शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रे यांच्यासोबत आणखी तीन सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. आयोगाच्या सदस्य पदी ओम प्रकाश जाधव, मारुती शिंगारे , मच्छिंद्रनाथ तांबे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले सुनील शुक्रे यांनी गेली दहा वर्षे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले असून या वर्षी 24 ऑक्टोबरला ते सेवानिवृत्त झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी जे निवृत्त न्यायाधीश जरांगे यांना जालन्यातील अंतरवाली सराटी गावात भेटण्यासाठी गेले होते, त्यामधे सुनील शुक्रे यांचा समावेश होता. त्याबरोबरच संजीव सानावणे यांच्या जागी मच्छिंद्रनाथ मल्हारी तांबे यांची सरकारने सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनीही सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी मारुती शिकारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बालाजी किल्लारीकर यांनी आरोप करत मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राज्य सरकारने त्यांच्या जागी ओमप्रकाश शिवाजीराव जाधव यांची नियुक्ती केली आहे.