लोणी काळभोर : आपल्या माणसांनी आपल्या माणसांची मारलेल्या मनमोकळ्या गप्पा, एकमेकांशी केलेली निखळ चर्चा, विचारांची देवाणघेवाण म्हणजेच हितगुज होय. हितगुज या दिवाळी अंकाच्या माध्यमातून संघटनेमधील डॉक्टरांना लेखनासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. वनिता काळभोर यांनी सांगितले.
पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशनच्या हितगुज या दिवाळी अंकाचे प्रकाशन कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवम हॉस्पिटलच्या कार्यालयात मंगळवारी (ता.१२) करण्यात आले. या सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. काळभोर बोलत होत्या. यावेळी डॉ. राहुल काळभोर, डॉ. रतन काळभोर, डॉ. संजय माने, डॉ. ओम कुमार, प्रिंट डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, राज्याचे खजिनदार विजय काळभोर, हवेली उपाध्यक्ष चंद्रकांत दुंडे, ज्येष्ठ पत्रकार तुळशीराम घुसाळकर, दिगंबर जोगदंड, पंढरीनाथ नामुगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. काळभोर पुढे म्हणाल्या की, ”हितगुज या दिवाळी अंकाच्या माध्यमातून संघटनेमधील डॉक्टरांना लेखनासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या माध्यमातून डॉक्टारांनी आपल्या जीवनातील अनुभव, प्रवास वर्णन, रुग्णांविषयी आलेले वेगवेगळे अनुभव, सुख-दु:खाचे प्रसंग, प्रदीर्घ आजारांवरील माहिती व खेळाचे महत्त्व या अंकाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. डॉक्टरांच्या संदर्भातील हितगुज या दिवाळी अंकाचे आज सगळ्यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. त्यामुळे आज खूप आनंद झाला आहे”.
आपले अनुभव कागदावर उतरविले पाहिजे
यावेळी बापूसाहेब काळभोर म्हणाले की, ”पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशन ही संघटना एक उत्तमप्रकारे काम करत आहे. तुम्ही अशीच समाजाची सेवा करा. आम्हीही करतोय, एकमेकांना मदत करू काम करू. जीवनात पत्रकार किंवा डॉक्टर म्हणून जगणे महत्त्वाचे नसते तर आपले अनुभव कागदावर उतरविले पाहिजे आणि उतरविलेले अनुभव प्रकाशित केले पाहिजेत. ते अनुभव वाचून नागरिकांना नक्कीच फायदा होईल. तसेच समाजसेवा करत असताना डॉक्टरांना पत्रकारांची काही मदत लागली तर नक्की करू”, असेही त्यांनी म्हटले.