पिंपरी : उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त झालेल्या मुलाने उपचार करणाऱ्या डॉक्टरला अश्लिल शिवीगाळ करून कानशिलात लगावली. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरबाबत ही घटना घडली. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १०) घडली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, याप्रकरणी महेश राजाराम कुंभार (वय २५ रा. वाघोली, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. ऋषीकेश हनमंत कुदळे (वय २५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी महेश याचे वडील राजाराम कुंभार वायसीएम रुग्णालयात दाखल होते. उपचारादरम्यान त्यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. ऋषीकेश यांनी ही माहिती रूग्णाच्या नातेवाईकांना दिली. वडील गेल्याचे दुःख सहन न झाल्याने महेश वडिलांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांकडे पुन्हा विचारपूस केली. त्यानंतर रागाने ओरडून डॉ. ऋषीकेश यांच्या हाताला हिसका मारून कानशिलात लगावली त्याचप्रमाणे मोठ्या आवाजात अश्लिल शिवीगाळ केली.