मुंबई : म्हाडाकडून ठाणे शहर आणि जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5311 सदनिकांची सोडत पुढे ढकलण्यात आली आल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात अली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही सोडत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. तसेच या सोडतीच्या नव्या तारखेसंदर्भात माहिती ही अर्जदारांच्या मोबाईवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती देखील मंडळातर्फे देण्यात आली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकारणाकडून पंधरा सप्टेंबर 2023 रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली होती. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता मंडळातर्फे सोडतीत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली होती. म्हाडाच्या या सोडतीसाठी एकूण 30, 687 अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह 24,303 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
या सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारुप यादी दिनांक 04 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध करण्यात आली. त्याचप्रमाणे या सोडतीसाठीचे स्वीकृत अर्ज हे 11 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. ही यादी म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या https://housing.mhada.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात येईल असं महाडकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1010 सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांनी PMAY योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे.
जर नोंदणी केली नसेल यशस्वी अर्जदारांनी नोंदणी करणे बंधनकारक राहील. त्यासाठी कोंकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच या सोडतीमध्ये एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1037 सदनिका, सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 919 सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी 67 सदनिका आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजने व्यतिरिक्त इतर सर्व योजनांकरिता 20 टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.