लोणी काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता असा सेवा पंधरवडा या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला आहे. मात्र,लोणी काळभोर व कदमवाकवस्ती हद्दीत तलाठी गैरहजरीमुळे सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम रखडला आहे. पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या सेवा पंधरवड्यात जर तलाठीच हजर राहत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांची कामे कधी होणार? अशी चर्चा पूर्व हवेलीतील नागरिकांमध्ये रंगली आहे
राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ असा सेवा पंधरवडा सुरु आहे. मात्र, मागील १५ दिवसांपासून लोणी काळभोर व कदमवाकवस्तीतील शेतकरीवर्ग तलाठी कार्यालयातील सातबारा, आठ अ उतारा व फेरफार सुविधेपासून तब्बल पंधरा दिवस वंचित राहिला आहे. त्यामुळे या तलाठी कार्यालयाला कोणी वाली आहे कि नाही? असा संतत्प सवालही शेतकऱ्यांनी केला आहे.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांचा सजा महसूलाच्या दृष्टीने मोठा मानला जातो. पुणे सोलापूर महामार्गालगतची ही गावे वेगाने विकसित होत आहेत. व याच ठिकाणी अपर तहसील कार्यालय प्रस्तावित आहे. आणि येथील नागरिकांना मागील पंधरा दिवसांपासून तलाठी कार्यालयातील सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोणी काळभोर येथील तलाठी पवन शिवले हे ४ सप्टेंबरपासून रजेवर गेल्याने हा पेच निर्माण झाला आहे. वास्तविकता ४ सप्टेंबरला तलाठी रजेवर गेल्याने त्याचदिवशी अन्यथा दुसऱ्या दिवशी तेथील पदभार अन्य तलाठ्यांना हवेली तहसील कार्यालयाने द्यायला हवा होता. मात्र तसे न होता १२ सप्टेंबरला लोणी काळभोर सजाचा तात्पुरता पदभार कोलवडी साष्टे सजाचे तलाठी यांना सुपूर्द केला.
त्यानंतर कोलवडी साष्टे सजाचे तलाठी यांना संगणकीय सातबाराची डीएससी (डिजीटल सिग्नेचर) वरिष्ठ कार्यालयाने सुरू न केल्याने येथील शेतक-यांना पंधरा दिवसांपासून सातबारा, आठ अ उतारा,व फेरफार मिळाला नाही. फक्त पंचनामे, ई पीक पहाणी, प्रधानमंत्री किसान योजनेसाठी याद्या याबाबत कामे झाली. आहेत.
दरम्यान, राज्यात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा सुरु आहे. तरीही लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील तलाठी कार्यालयातून रजिस्टर हक्क सोडपत्र, बक्षिसपत्र, खरेदीखत दस्तांचे औनलाईन ई म्युटेशन असा एकाही दस्ताचा फेरफार मागील पंधरा दिवसांत झाला नाही. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.