उरुळी कांचन (पुणे) : मागील काही दिवसांपासून उरुळी कांचनसह परिसरात अनेक ठिकाणी भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. लोणी काळभोर पोलिसांची एवढी तगडी पोलिस यंत्रणा असतानाही अंधाराचा फायदा घेत पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ, शिंदवणे, उरुळी कांचनसह परिसरात अवैध धंद्यासह भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
अशा वाढत्या घटनांमुळे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. उरुळी कांचनसह परिसरात संध्याकाळच्या वेळेत पोलीस गस्त घालीत नसल्याने परिसरात अवैध धंदे, भुरट्या चोऱ्यामध्ये वाढ झाल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.
एका ग्रामपंचायत हद्दीत एका महिन्याच्या कालावधीत दोन वेळा त्याच ठिकाणी चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र, अशा घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होवून अशा प्रवृत्ती विरूद्ध उपाय योजना व्हावी अशी जनसामान्यांमधून मागणी होत आहे.
दरम्यान, उरुळी कांचन, कोरेगावर मुळ, शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांच्या तळीरामांचे अड्डे भरत असल्याने यातूनच भुरटे गुन्हे, वादविवादाचे प्रकार घडत आहेत. सदर ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.