अतुल जगताप
सातारा : “ध्येयवादी विद्यार्थी चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणत्याही आव्हानाचा सामना सहज करू शकतात. सातत्य असेल तर यश नक्की मिळते. पण त्यासाठी परिश्रमाशिवाय पर्याय नाही” असे प्रतिपादन कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी केले.
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेच्या उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनिता घार्गे होत्या. वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस.एस. पवार, जिमखाना विभागाच्या प्रमुख प्रा. स्मिता कुंभार, भूगोलशास्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिजित फटे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसून परिश्रम आणि स्वतःवरील विश्वास यावरच यश अवलंबून असते असेही फरांदे म्हणाल्या. तर अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रो. डॉ. सुनिता घार्गे यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्याकडे विद्यार्थिनींनी लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अभिजित फटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. स्मिता कुंभार यांनी करून दिला. प्रा. जयश्री बाबर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा. निरंजन फरांदे यांनी मानले.