Nawab Malik On Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी आज अजित पवार गटात सहभागी होत सत्ताधारी बाकावर बसले. नवाब मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याने भाजपवरही जोरदार टीका होऊ लागली असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित विरोध केला आहे.
नेमकं काय आहे पत्रात?
प्रति,
श्री. अजितदादा पवार,
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सस्नेह नमस्कार,
माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.
परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे.
सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.
त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झालो तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणान्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.
सत्ता येते आणि जाते.
पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा… pic.twitter.com/WDzm3Pjo3f— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023