सध्या बदलत्या जीवनशैलीनुसार, कामाचे स्वरूपही बदलत जात आहे. परिणामी, शारीरिक हालचाली कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सारखं एकाच जागी बसून काम करणाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी. शारीरिक, मानसिक ताणतणाव वाढल्यानं अन्य आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे आपल्या हृदयावरही ताण येतो. हृदयविकाराशी संबंधित आजारांचा धोका टाळण्यासाठी तुम्ही आपल्या हृदयाच्या गरजा जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.
पुरेशी झोप महत्त्वाची असते. डोळ्यांव्यतिरिक्त मेंदू, हृदय, आपलं संपूर्ण शरीर निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. कारण झोपेत असताना आपले शरीर नुकसान झालेल्या पेशी दुरुस्त करण्याचे कार्य करत असते. यासाठी नियमित सात ते आठ तासांची झोप घेणे गरजेचं आहे. तसेच एकाच ठिकाणी भरपूर वेळ बसून काम करणाऱ्यांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मसालेदार, तेलकट पदार्थांचे सेवन करणं टाळावे.
फळे, कोशिंबीर, सुकामेवा आणि उकडलेल्या भाज्या खाव्यात. डबाबंद खाद्यपदार्थ खाणे टाळावे. यामध्ये चरबीयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात असतात. ते शरीरासाठी अपयकारक ठरू शकतात. याशिवाय, बैठ्या स्वरुपातील कामातून दोन ते तीन मिनिटांचा वेळ काढून सोपे व्यायाम प्रकार करावे. यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत आणि संतुलित प्रमाणात सुरू राहील. जेणेकरून हृदयाकडून संपूर्ण शरीराला योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होण्यास देखील मदत मिळेल.