Mahaparinirvan Din 2023 : पुणे : बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ६ डिसेंबर १९५६ रोजी झाले. म्हणून दरवर्षी ६ डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्यतिथी दिवस म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांची पुण्यतिथी देशभरात ‘महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी संविधानाची निर्मीती केली होती. ते थोर समाजसुधारक आणि अभ्यासक होते. आपले संपूर्ण आयुष्य जातिवाद दूर करण्यासाठी तसेच, गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले होते. आंबेडकरांनी १९५६ साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता.
जाणून घेऊया बाबासाहेबांच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
बौद्ध धर्म स्वीकारला : बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आंबेडकर आणि त्यांच्या समर्थकांनी पंचशील ग्रहण करून बौद्ध धर्म स्वीकारला. हिंदू धर्मातील अनेक प्रथांवर ते फारच नाराज झाले होते. त्यानंतर ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले.
बाबासाहेब ज्ञानाचा सागर : बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील काही महान विद्वानांपैकी एक होते. ते विविध ३२ विषयांत पदवीधर होते. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते एमए करण्यासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात गेले. याच विद्यापीठामधून त्यांनी पीएचडीही केली. त्यानंतर बाबासाहेबांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एमएससी, डीएससी केले. बॅरिस्टर-एट-लॉ म्हणून पदवी प्राप्त केली. त्याकाळी एल्फिन्स्टन कॉलेजमधून शिक्षण घेणारे ते एकमेव दलित विद्यार्थी होते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार : भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कायदेविषयक कौशल्य भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये अत्यंत उपयुक्त ठरले. त्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे निर्माता आणि संविधानाचे जनक म्हटले जाते. त्यांनी संविधान बनवण्यापूर्वी अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास केला होता. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते भारताचे पहिले कायदा मंत्री पदापर्यंत पोहोचले.
संधीचे सोने केले : आंबेडकरांचे पूर्वज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत सैनिक होते. वडील ब्रिटिश भारतीय सैन्यात सुभेदार होते. त्यामुळे आंबेडकरांनाही शाळा शिकण्याची संधी मिळाली. त्याकाळी दलित आणि अस्पृश्य जातीतील मुलाला शाळेत जाऊन शिक्षण घेणे शक्य नव्हते.आंबेडकरांना शाळेत इतर मुलांइतके अधिकार नव्हते. त्यांना वेगळे बसायला लावले होते. शिवाय, त्यांना चुकीची वागणूकही मिळत होती. मात्र, त्यावेळी शिक्षणाला अधिक महत्त्व देत बालपणापासून आपला लढा सुरू ठेवला.
अन्याया विरोधात उठवला आवाज : आंबेडकरांनी दलितांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ‘बहिष्कृत भारत’, ‘मूक नायक’, ‘जनता’ ही पाक्षिक व साप्ताहिके प्रकाशित करण्यास सुरुवात केली. १९२७ पासून त्यांनी अस्पृश्यता आणि जातीयवादाच्या विरोधात चळवळ तीव्र केली. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड मधील चवदार तळे येथेही त्यांनी सत्याग्रह सुरू केला. त्यांनी काही लोकांसोबत ‘मनुस्मृती’ची तत्कालीन प्रत जाळली. १९३० मध्ये त्यांनी काळाराम मंदिर चळवळ सुरू केली.
मंत्रीमंडळातील पदाचा राजीनामा : १९५१ मध्ये त्यांनी संसदेत ‘हिंदू कोड बिल’ सादर केले. जेव्हा महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा मिळेल आणि पुरुषांप्रमाणे समान अधिकार मिळतील तेव्हाच खरी लोकशाही येईल, असा विश्वास डॉ.आंबेडकरांना वाटत होता. हिंदू कोड बिलाचा मसुदा संसदेत रोखण्यात आल्यानंतर आंबेडकरांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.
अंबाडवेकर हे बाबासाहेबांचे खरे नाव : बाबासाहेब आंबेडकरांचे खरे नाव ‘अंबाडवेकर (Ambadawekar)होते. त्याच्या वडिलांनीही शाळेत याच नावाची नोंद केली होती. पण त्यांच्या एका शिक्षिकेने त्यांचे नाव बदलून त्यांना त्यांचे आडनाव म्हणजेच ‘आंबेडकर’ हे आडनाव दिले. आणि शाळेच्या नोंदींमध्ये त्यांचे नाव आंबेडकर म्हणून नोंदवले गेले.
वयाच्या १५ व्या वर्षी लग्न : बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात बालविवाह प्रचलित असल्याने आंबेडकरांचा एप्रिल १९०६ मध्ये ८ वर्षांच्या रमाबाईशी विवाह झाला. मुंबईतील भायखळा भागात हा विविह सोहळा पार पडला. त्यावेळी बाबासाहेब अवघे १५ वर्षांचे होते.
बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. परिनिर्वाण हे बौद्ध धर्मातील प्रमुख तत्वांपैकी एक तत्त्व आहे. ‘परिनिर्वाण’ चा अर्थ ‘मृत्यूनंतरचे निर्वाण’. बौद्ध धर्मानुसार, जो व्यक्ती निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक इच्छा आणि भ्रमांपासून मुक्त होतो. आंबेडकरांची पुण्यतिथी म्हणजेच, महापरिनिर्वाण दिन या दिवशी लोक त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात. दिवे आणि मेणबत्त्या पेटवून त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतात. त्यांच्या स्मरणार्थ अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांचे विचार आणि त्यांची संघर्षगाथाही सांगितली जाते.