पुणे : गाडी बाजूला घेण्याच्या वादातून एका टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना लोहगाव (पुणे) परिसरात रविवारी (ता.१८) उघडकीस आली आहे. या मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी ५ जणांच्या विरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कालिदास खांदवे, माऊली खांदवे (रा. लोहगाव) व अन्य तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी पी. आर. मोटे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटे हे विमानतळ पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. त्यांनी धानोरी जकात नाका परिसरात मोटार लावली होती. त्यांच्या मोटारीजवळ आरोपी खांदवे यांनी दुचाकी लावली होती. मोटे यांनी खांदवे याला दुचाकी काढण्यास सांगितले. त्यानंतर खांदवे याने साथीदारांना तेथे बोलावून घेतले. खांदवे आणि त्याच्या साथीदारांनी पोलीस कर्मचारी मोटे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. तेव्हा आरोपींनी मोटे यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. मारहाणीत मोटे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, प्रकरणी पोलीस कर्मचारी पी. आर. मोटे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कालिदास खांदवे, माऊली खांदवे (रा. लोहगाव) यांच्यासह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. लहाने करीत आहेत.