दीपक खिलारे
इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यातील पहिले मत्स्य मार्केट सुविधा केंद्र इंदापूर येथे २०१२ मध्ये सुरू केले. तसेच मच्छीमार, मत्स्य व्यावसायिक यांना वेळोवेळी व्यवसाय वाढीसाठी सहकार्य केले, त्यामुळेच इंदापूर तालुक्यातील मत्स्य उद्योग हा राज्यात नावारूपास आला आहे. इंदापूर तालुक्यातील मत्स्य व्यवसायाच्या विकासामध्ये हर्षवर्धन पाटील यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अॅड. शरद जामदार यांनी रविवारी (ता. ३) केले.
इंदापूर तालुक्याला उजनी जलाशयाचे वरदान लाभले आहे, त्याचा फायदा इंदापूर तालुक्यातील मच्छीमार, मच्छ व्यावसायिक व नागरिकांना व्हावा यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळामध्ये असताना इंदापूर येथे बाजार समितीमध्ये सुमारे ८ कोटी रुपये खर्चाचे सर्व सुविधायुक्त असे मत्स्य मार्केट उभारले. त्यामुळे येथील मच्छी हैदराबाद, मुंबई, कोकण आदी राज्यांच्या सर्व भागांमध्ये तसेच परदेशातही जात आहे. त्याचा लाभ मच्छिमार, मच्छ व्यावसायिकांना मिळत असून, शेकडोंना रोजगार उपलब्ध झाला आहे, असे अॅड. शरद जामदार यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींकडे मत्स्य विभागाचे मंत्रीपद असतानाही तसेच त्यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात त्यांना तालुक्यातील मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी काही काम करता आलेले नाही. उजनी जलाशयामध्ये आता अपुरा पाणीसाठा असताना निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी काम दाखविण्यासाठी उजनी जलाशयात मत्स्य बीज सोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला, असे अॅड. शरद जामदार यांनी नमूद केले.